रविवार, १३ मार्च, २०११

आम्ही असेच !!

आम्ही असेच !!
जगायला आलो होतो,
पण नुसतेच जिवंत राहिलो !! ||धृ.||


लहानपणापासून शिकतोय ना,
घसरगुंडीवर चढून, पुन्हा खालीच घसरायला !!
अंथरूण पाहून, पाय पसरायला !!


कोवळ्या वयात स्वप्नांच्या क्षितिजावर
रात्रीच्या चांदणसरी सोडून,
बागुलबुवा कोरला गेला !
मानगुटावरचं जगण्याचं ओझं
'भूत' म्हणून मोकळे झालो !  || १ ||
आम्ही असेच !!


जगण्याची हौस कधी भागवलीच नाही
'मागल्या जन्माचे भोग' म्हणत
कंठत राहिलो, आल्या संधी हुकवत राहिलो !


सोडलेली संधी अन् 'न' केलेले प्रयत्‍न
यांची बेरीज हातांच्या रेषांवर
'नशीब' म्हणून मांडत राहिलो !


ना-कर्ते पणाची खापरं
दैवावर खुशाल फोडत,
शेंदूर फासल्या दगडांशी, तेल-तूप जाळत राहिलो !! || २ ||


आम्ही असेच !!
जगायला आलो होतो,
पण नुसतेच जिवंत राहिलो !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :