बुधवार, १८ जून, २०१४

पाऊस पडत असेल बघ !

पाऊस पडत असेल बघ
तुझ्या आठवांच्या गावी ।
मनात अशी रेशीमओळ
उगीच मला सुचेल का!!

तुझी चाल लाऊन सखे
गाणे होते कवितांचे ।
लय अशी वेड्या वेळी
हृदय उगीच धरेल का!!

जाग येतेच समेवर
झोप देखील मंत्रमुग्ध ।
तुझ्या चांदणचाहूलीची
वेळ कधी चुकेल का!!

नाही म्हणून पाऊस देखील
ऐकत नाही कुणाचं ।
मुसळधार कोसळताना
मन कोरडे ठेवेल का!!

जरा धरेला ओलेत्याने
भिजवून जाता नभ आवेगा ।
इंद्रधनूची पखरण होता
सुख कोरडे राहिल का!!

लिहितो नाही शिंपण होते
तुझ्या किती गं आठवणींची ।
सरता शाई शब्दो शब्दी
कविता होणे राहिल का!!

- रोहित ऊर्फ दुष्यंत

रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

कसे क्षणांना उमजत नाही !



कसे क्षणांना उमजत नाही, पळता पळता पाठोपाठ !
आला, गेला, सरला, नुरला, घडा जीवाचा काठोकाठ !!

कधी अचानक डोळा येते दाटून कुठली जुनी आठवण !
मिळता क्षणभर उसंत, द्यावी थेंबांना डोळ्यातून वाट !!

जरा आगळे मनाजोगते जगण्याचीही अभिलाषा उत्कट !
सुखासीन सारे हवे वाटता, कष्टाचीही चोखाळावी वाट !!

जरा काळजी, अगत्य थोडे कधी चौकशी माहित नाही !
किती द्यायचे- किती घ्यायचे असली गणिते तोंडपाठ !!


- रोहित ऊर्फ दुष्यंत

रविवार, २० मे, २०१२

उदंड होते कधी स्तब्धता !


कुणास ठाऊक चिंब भिजावे वाटत असता,
दाटून येता नभ मेघांनी, नको वाटते !!

कुठल्याशा त्या प्रश्नासाठी फरफट सारी,
उत्तर अवघे गवसू येता, पुरे वाटते !!

शून्यांची गणितेही सारी जमेस जाता,
आनंदाच्या झोळीलाही 'रिते वाटते' !!

कल्लोळांच्या आलापीचे यमक रोजचे,
उदंड होते कधी स्तब्धता, बरी वाटते !!

कधी अवेळी दाटून येते कुठली कविता,
विरते स्पंदन आवेशाचे, मुके वाटते !!

- रोहित ऊर्फ दुष्यंत

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

जगण्याचे क्षण चार, जगायचे ते राहून गेले !


रम्य सकाळी सारे अलगद किलबिलताना,
अगम्य ऐशी साखरस्वप्ने रंगवताना,
पहाट-परडी प्रसन्नतेच्या प्राजक्ताने,
कुपीत अत्तर भरावयाचे राहून गेले... !

एकांताच्या कुण्या किनारी विसावताना,
अखंड लाटा कवेत घेऊन स्थिरावताना,
आठवणींचे असे पसरले शंख-शिंपले,
बरेच वेचून साठवायचे राहून गेले... !

जगण्याचे क्षण चार, जगायचे ते राहून गेले !
बघण्याचे पण फार, बघायचे ते राहून गेले !!
- रोहित ऊर्फ दुष्यंत

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१२

सहज सुचलं ... लिहून टाकलं !!

 तसे नव्याने कळले आता तुझे बोलणे,
पुन्हा नव्याने जुनेच सारे बोलत होतो !
जुन्याच वाटा नवे काहीसे सांगून जाती,
असाच माझ्या सोबत रस्ता शोधत होतो !!

- रोहित ऊर्फ दुष्यंत