सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

कळी

त्या कळीचे स्वप्न होते, फूल मोठे व्हायचे |
गंध सारा काळजातील वाटता लहरायचे ||

तोडले तिजला असे पाहुनी सौंदर्य आणि |
त्या कळीचे स्वप्न ऐसे मोडले जागेपणी ||

होय होता राहिलेले स्वप्न हे अर्ध्यावरी |
गंध वेडा लाजणारा राहिला त्याच्या ऊरी ||

ह्या कळीची ही व्यथा एका फुलाला समजली |
दु:ख त्याचे हळुवार ती झुळुक सांगून गेली ||

फूल ते कोण्या कळीचे सत्यात आले स्वप्न आहे |
अंतरातील गंध लुटतो मुक्त हा मकरंद आहे ||

सौख्य आहे सर्वस्व देण्या ते सुगंधी फूल म्हणते |
कोण रूसलेल्या मनातील पाकळीला ते उघडते ||

या फुलांनी रंगलेल्या वाटिका आणि वनश्री |
त्या कळीची आर्तता ती जाऊदे त्यांच्या मनी ||


-रोहित ऊर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :